संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
भिगवणमथील कोंडीराम सदाशिव क्षीरसागर आर्ट्स,कॉमर्स,सायन्स जुनिअर कॉलेज येथील बारावीचे परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पारित केले आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की,फेब्रुवारी २०२५ च्या बारावीच्या परीक्षेवेळी या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीजवळ भरारी पथकास कॉपी सापडली होती.त्यामुळे या विद्यार्थिनीवर कॉपी केस करून विभागीय शिक्षण मंडळाकडून परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले. तद्नंतर विद्यालयाने या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली केली. इंदापूर तालुक्यातील आणखी एका परीक्षा केंद्रावर असाच प्रकार उघडकीस आला होता तरीही विभागीय मंडळाकडून ते परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू करण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली.केवळ एका विद्यार्थिनीजवळ कॉपी सापडल्याने पूर्ण परीक्षा केंद्र रद्द करणे योग्य नसल्याचे मत नोंदवण्यात आले. कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात असेही न्यायालयाने निरीक्षणामध्ये नमूद केले याबाबत दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला.त्यानंतर पुढील शैक्षिणक वर्ष २०२६/२७ पासून क्षीरसागर विद्यालयातील परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. संस्थेच्या / विद्यालयाच्या वतीने ऍड.लक्ष्मण देशमुख यांनी युक्तिवाद केला.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर यांनी सांगितले की,येत्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू होणार आहे.फेब्रुवारी २०२७ मधील बारावीच्या परीक्षा क्षीरसागर विद्यालयातच होणार आहेत.एका विद्यार्थ्याच्या गैरप्रकारामुळे संपूर्ण परीक्षा केंद्र रद्द करणे अयोग्य आहे.असा निर्णय संस्थेच्या प्रतिमेला धक्का देणारा असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. न्यायालयाने परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने पालक व विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले आहे.







