शमशुद्दिन शेख
तालुका प्रतिनिधी, मुदखेड
मुदखेड : मुदखेड तालुक्यातील महसूल विभागाच्या काही तलाठी कार्यालयांमध्ये सध्या अधिकाऱ्यांपेक्षा खाजगी ऑपरेटरच अधिक सक्रिय दिसत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे अनेक तलाठी कार्यालये मुख्य प्रशासकीय इमारती ऐवजी गल्लीबोळातील भाड्याच्या जागेत सुरू असल्याने नागरिकांना कार्यालय शोधण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा तलाठी कार्यालयात संबंधित तलाठी उपस्थित नसतात. त्यांच्या जागी खाजगी ऑपरेटर नागरिकाकडून अर्ज घेणे, ऑनलाईन नोंदी करणे, कागदपत्र तपासणे, फेरफार अर्ज भरणे अशी कामे करताना दिसतात. महसूल विभागाचे अत्यंत महत्त्वाचे काम खाजगी व्यक्तीकडून चालवले जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सातबारा उतारे, आठ अ, फेरफार, वारस नोंद, उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, पीक नोंदणी अशा कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक तलाठी कार्यालयात येत असतात. मात्र कार्यालये गल्लीबोळामध्ये असल्याने वृद्ध, महिला आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी बसण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना उभे राहून प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार आहे. याशिवाय काम लवकर करून देतो, ऑनलाईन एन्ट्री तातडीने करतो असे सांगत काही ऑपरेटर नागरिकांकडून पैशाची मागणी करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे महसूल विभागातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक नागरिकांनी कार्यालयात तलाठी कमी आणि ऑपरेटर जास्त दिसतात अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. महसूल विभागाच्या नियमानुसार तलाठी कार्यालयातील अधिकृत कामकाज हे शासकीय अधिकाऱ्यामार्फत होणे अपेक्षित आहे. खाजगी ऑपरेटरला केवळ संगणकीय कामापुरतीच मर्यादा असते. मात्र प्रत्यक्षात काही कार्यालयांमध्ये ऑपरेटरच संपूर्ण कारभार सांभाळत असल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांकडून चौकशीची मागणी होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना सध्या दाखल्यांसाठी अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत असून ऑनलाईन प्रक्रियेच्या नावाखाली अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात संबंधित तहसीलदार व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून तलाठी कार्यालयाची पाहणी करावी, अधिकृत कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी आणि घडत असलेल्या गैरप्रकारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.







