वर्धा: वर्धा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणाऱ्या मानद वन्यजीव रक्षक नियुक्त्यांची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली असून यावेळी प्रथमच तीन व्यक्तींना संधी देण्यात आली आहे. महसूल व वन विभागाच्या १३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार श्री. कौशल केदारनाथ मिश्रा, श्री. कौस्तुभ विजय गावंडे आणि श्री. प्रणव सुरेंद्र जोशी यांची पुढील तीन वर्षांसाठी मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी वर्धा जिल्ह्यातून केवळ दोन मानद वन्यजीव रक्षक प्रतिनिधित्व करत होते. मात्र यंदा प्रथमच तीन व्यक्तींना संधी देत शासनाने वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत नव्या पिढीतील कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राज्यस्तरीय प्रतिनिधित्व अधिक सक्षम होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
वन्यजीव संरक्षण व जनजागृती क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेले ज्येष्ठ नागरिक श्री. कौशल मिश्रा यांची सलग पाचव्यांदा मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ वन विभागासह नव्याने नियुक्त झालेल्या युवा प्रतिनिधींनाही होणार आहे.
नियुक्त मानद वन्यजीव रक्षकांपैकी श्री. कौस्तुभ गावंडे हे पीपल फॉर एनिमल या प्राणी व वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेशी संलग्न असून वन्यजीव संवर्धन, जनजागृती आणि बचाव कार्यामध्ये सक्रिय योगदान देत आहेत, तसेच श्री. प्रणव सुरेंद्र जोशी यांनी महाराष्ट्र शासनाच्या वर्धा जिल्हा पर्यावरण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून पर्यावरण तज्ज्ञाच्या भूमिकेत यशस्वीपणे कार्य केले आहे. पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि जनजागृती विषयांवरील त्यांच्या अनुभवामुळे वन्यजीव संरक्षणाच्या कार्याला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात वन्यजीव संरक्षण, जनजागृती आणि मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्रिय सहभागाची आवश्यकता असते. यावेळी नियुक्त झालेल्या युवा मानद वन्यजीव रक्षकांच्या ऊर्जावान सहभागामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धन व विकासाला निश्चितच चालना मिळेल. तसेच वन्यप्राण्यांबाबत जनजागृती वाढून मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटनांमध्ये घट होण्यास मदत होईल, असा विश्वास वन्यजीव प्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि संवर्धन क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
वर्धा जिल्ह्यातील वन्यजीव संवर्धनाच्या इतिहासात प्रथमच तीन मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून अनुभवी मार्गदर्शन आणि युवा ऊर्जेच्या संगमातून बोर व्याघ्र प्रकल्पासह संपूर्ण जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षण चळवळीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







