रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागाव : तालुक्यातील सवना शिवारातील परिसरात रानडुकर, रोही व अन्य वन्यप्राण्यांचा वाढता वावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरला आहे. पिकांची नासधूस, अतिरीक्त नुकसानग्रस्तपणा आणि वनविभागाकडून अपेक्षित उपाययोजनांचा अभाव यामुळे शेतकरी आर्थिक तसेच मानसिक संकटाचा सामना करत आहेत. सवना येथील शेतकरी गोविंदराव देशमुख यांच्या सुमारे तीन एकरांतील ऊस पिकात रानडुकरांच्या कळपाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या नुकसानीत अंदाजे 15 ते 20 टन ऊसाचे नुकसान झाल्याचा त्यांचा दावा आहे. कापणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकाची झालेली हानी शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक फटका ठरत आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, सवना परिसरात रानडुकरांचे कळप आता दिवसाही शेतांमध्ये मुक्तपणे वावरत आहेत. त्यामुळे शेतीची कामे करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पिकांच्या संरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीसाठी शासनाकडून मिळणारी भरपाई प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत अत्यल्प असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. तात्पुरत्या आर्थिक मदती ऐवजी वन्यप्राण्यांचा प्रभावी बंदोबस्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. सवना परिसरात उसाबरोबरच केळी आणि इतर पिकांचेही सातत्याने नुकसान होत असल्याने वनविभागाने तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच वन्यप्राण्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनांकडूनही होत आहे.







