नागेश निकोसे
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात ‘जागतिक पर्यावरण दिन’ विविध जनजागृतीपर, पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि शाश्वत विकासाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार, त्यांच्या कुटुंबीयांसह शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना “Inspired by Nature for Climate for Our Future” (भविष्यातील हवामानासाठी निसर्गातून प्रेरणा) ही होती. या संकल्पनेला अनुसरून पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम राबविण्यात आले.
चित्रकला स्पर्धेत चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पर्यावरण दिन सप्ताहाची सुरुवात दि. ३१ मे २०२६ रोजी क्लब क्र. २ येथे आयोजित चित्रकला स्पर्धेने झाली. या स्पर्धेत १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण, प्रदूषणमुक्त जीवन आणि हरित भविष्य या विषयांवर आकर्षक चित्रे साकारली. स्पर्धेचे परीक्षण सौ. सोनल पाटील आणि सौ. शुभांगी सालवणकर यांनी केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना चित्रकलेचे साहित्य आणि खाऊ बॉक्स देऊन प्रोत्साहित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
प्लास्टिकमुक्त जीवनशैलीसाठी ज्यूट बॅग वाटपाचा अभिनव उपक्रम
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यंदाचा सर्वात नाविन्यपूर्ण आणि विशेष उपक्रम म्हणजे प्लास्टिकमुक्तीचा संदेश देणारे ज्यूट बॅग वाटप. मुख्य अभियंता श्री. सुदीप राणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन कार्यालयीन तसेच वैयक्तिक जीवनात प्लास्टिकचा वापर कमीत कमी करण्याचा संदेश देण्यात आला. याअंतर्गत प्रातिनिधिक स्वरुपात सर्व विभाग प्रमुखांना आणि पाहुण्यांना पर्यावरणपूरक ज्यूट बॅगचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमामागील व्यापक दृष्टीकोन म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केवळ कार्यालयातच नव्हे तर घरगुती वापरात, बाजारपेठेत खरेदी करताना आणि दैनंदिन जीवनात प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून ज्यूट बॅगचा अवलंब करावा. भविष्यात संपूर्ण वीज प्रकल्प, निवासी वसाहत आणि परिसर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल ठरले आहे.
घोषवाक्य, निबंध आणि ऑनलाइन क्विझ स्पर्धांचे आयोजन
पर्यावरण संरक्षणाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि कंत्राटी कामगारांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये घोषवाक्य लेखन व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदल, जैवविविधतेचे महत्त्व, जलसंधारण आणि ऊर्जा बचत यांसारख्या विषयांवर प्रभावी विचार मांडण्यात आले.
तसेच पर्यावरण विषयक ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी ऑनलाइन क्विझ स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धांना सर्व स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळाला.
ऊर्जा बचतीसाठी एक तास वातानुकूलित यंत्रणा बंद
दि. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऊर्जा बचत आणि हरित पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सर्व विभागांतील वातानुकूलित यंत्रणा (एसी) एक तासासाठी बंद ठेवण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. ऊर्जा संवर्धन हीदेखील पर्यावरण संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
पथनाट्याद्वारे पर्यावरण जनजागृती
जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता कोराडी औष्णिक विद्युत केंद्र परिसरात “पर्यावरण वाचेल तरच भविष्य उजळेल” या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले.
या पथनाट्यातून वाढते प्रदूषण, प्लास्टिकचा अनियंत्रित वापर, जंगलतोड, जलस्रोतांचे प्रदूषण आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच वृक्षारोपण, ऊर्जा बचत, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि पर्यावरणपूरक सवयींचा स्वीकार करण्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. या पथनाट्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या निवासी वसाहतीत मुख्य अभियंता श्री. सुदीप राणे तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते आम्रवृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत भविष्यात अधिकाधिक वृक्ष लागवडीचा संकल्प यावेळी करण्यात आला.
मार्गदर्शनपर कार्यक्रमात तज्ज्ञांचे विचार
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रम दुपारी ३.०० वाजता सर्व्हिस बिल्डिंग येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ डॉ. विजय येउल यांच्या प्रास्ताविक व अहवाल वाचनाने झाली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले व्ही.एन.आय.टी. नागपूरचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अजय टेंभूरकर यांनी हरित पर्यावरण, हवामान बदल, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी व्यक्ती, संस्था आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे कार्य करण्याची गरज अधोरेखित केली तसेच अनेक उपयुक्त उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी मुख्य अभियंता श्री. सुदीप राणे यांनी प्लास्टिकला पर्याय म्हणून ज्यूट बॅगचा वापर, ऊर्जा बचत, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला उपमुख्य अभियंता श्री. शैलेन्द्र कासुलकर, श्री मूल, उपमुख्य महाव्यवस्थापक (वि.व.ले.) सौ. सीमा महाले, अधीक्षक अभियंते श्री. सचिन भगेवार, श्री. राजेश डाखोळे, सौ. सारिका सोनटक्के, सौ. किरण नानवटकर, श्री. मनोज उमप यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय सौ. मानिनी वारजूरकर यांनी करून दिला तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रियंका देशमुख यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री. अक्षय राणे यांनी केले.
कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकासाबाबतची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करणारे हे उपक्रम भविष्यातही अशाच उत्साहाने राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.







