रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागाव :
पोलीस ठाण्याने गुन्हेगारीविरोधात धडक कारवाई करत दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकून ११ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. तसेच अवैध रेती वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त करून संबंधितावर भारतीय न्याय संहिता (बि एन एस) अंतर्गत गुन्हा नोंद केला.
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ग्राम खडका फाटा येथील जंगल परिसरात सुरू असलेल्या ५२ पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व इतर मुद्देमाल असा एकूण २.३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर ग्राम मुडाणा येथील नॅशनल हायवे ३६१ लगतच्या परिसरात सुरू असलेल्या आणखी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेऊन २८,९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातही महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
याचबरोबर ग्राम धनोडा येथील नॅशनल हायवे ३६१ वरील पुलाजवळ अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला. कारवाईदरम्यान सुमारे ५.०५ लाख रुपयांचा ट्रॅक्टर व रेतीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बि एन एस ) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संयुक्त कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे व त्यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.







