संजय लांबे
तालुका प्रतिनिधी ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या एकूण ०८ शाळा नगरपरिषद प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात आणि या संदर्भात नगरपरिषदेमध्ये ठराव मंजूर करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा परिषद शाळा सहयोग समिती, कुर्झाच्या वतीने नगराध्यक्ष योगेश मिसार व उपाध्यक्ष नितीन उराडे यांना एक सविस्तर व अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.ब्रम्हपुरी हे शहर ‘शैक्षणिक नगरी’ म्हणून नावारूपास आलेले असले, तरी शहरातील या जिल्हा परिषद शाळा सद्यस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अभावामुळे आणि निधीअभावी भौतिक सुविधांपासून काहीशा मागे पडत आहेत. त्यामुळे गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक व हक्काचे मोफत शिक्षण मिळावे यासाठी या शाळांचे नगरपरिषद प्रशासनाकडे हस्तांतरण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. वडसा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथील जिल्हा परिषद शाळांचे ज्याप्रमाणे नगरपरिषद प्रशासनात यशस्वी हस्तांतरण झाले आहे, त्याच धर्तीवर ब्रम्हपुरीतही हा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी समितीने केली आहे.भौतिक व डिजिटल पायाभूत सुविधा, शाळा परिसरातील स्वच्छता, शाळांची पटसंख्या वाढ, क्रीडांगणे विकास. शिक्षकांची नेमणूक या महत्वाच्या सुविधांसाठी शाळा हस्तांतरण गरजेचे आहे हे समितीने निवेदनात व्यक्त केले. निवेदन सादर करतेवेळी जिल्हा परिषद शाळा सहयोग समितीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने दिनेश मुंडले सुनील विखार ,गोकुळ सहारे, शिरीष साखरकर, मोहनीश उराडे नितेश आं बोरकर , चेतन खेत्रे,, उमेश व्ही. बावणकुळे, गणेश एच. धनजुळे, मोतीलाल देशमुख, मोहन एन. वैद्य* यांच्यासह समितीचे इतर सर्व सभासद व क्षेत्रातील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.







