नलुताई मातणे तालुका प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : दारव्हा राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना जुन्या बसस्थानक परिसरातील रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेले सुमारे 60 वर्षे जुने पिंपळ व निंबाचे वृक्ष आता वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारी अनेक लहान-मोठी झाडे हटविण्यात आली, मात्र ही दोन वृक्ष आजही कायम असल्याने नागरिक आणि वाहतूकदारांकडून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या वृक्षांमुळे वाहनांना वळसा घालून जावे लागत असून विशेषतः अवजड वाहनांच्या वाहतुकीवेळी अपघाताचा धोका वाढत आहे. कोट्यवधी रुपयांचा महामार्ग तयार होत असताना भविष्यात वाहतुकीत अडथळे कायम राहणार असतील, तर या विकासकामाचा उद्देशच काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. याच परिसरातील काही दुकानदार झाडांच्या आडोशाचा वापर करून माल व साहित्य रस्त्यालगत ठेवत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अतिक्रमण वाढून रस्त्याची प्रभावी रुंदी कमी होत आहे. विशेष म्हणजे, दुकानांसमोर माल उतरविणारे ट्रक अनेकदा मुख्य रस्त्यावरच उभे राहत असल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी किरकोळ अपघातांच्या घटनाही घडल्याचे नागरिक सांगतात. अशा परिस्थितीत झाडांच्या आडोशाने पुन्हा अतिक्रमण वाढल्यास वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महामार्गाच्या कामात इतर झाडे हटविण्यात आली असताना केवळ या दोन वृक्षांबाबत वेगळा निर्णय का घेतला गेला, याबाबत शहरात विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. या चर्चांना कोणताही अधिकृत दुजोरा नसला तरी संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणी नागरिक आणि वाहतूकदारांकडून होत आहे. वाहतुकीची सुरक्षितता, पर्यावरणीय नियम आणि सार्वजनिक हित यांचा समतोल साधत वनविभागाच्या आवश्यक परवानगीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्पष्ट भूमिका घ्यावी, तसेच रस्त्यावर मालवाहू ट्रक उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पोलीस व संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.







