सुरेश राठोड
तालुका प्रतिनिधी, माहूर
माहूर : माहूर येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी दि. 15 निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ व निर्भय युवा समाजकार्य संघटनेची संयुक्त आढावा बैठक उत्साहात पार पडली. संघटन अधिक सक्षम करून पत्रकारांच्या हक्कांसह तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीत माहूर तालुका व शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माहूर शहराध्यक्षपदी कुंदन तिवडकर, उपाध्यक्षपदी गोपाल चव्हाण, सचिवपदी अंबादास मुकटे, सहसचिवपदी संजय वडसकर, कोषाध्यक्षपदी सुरेश राठोड तर सदस्यपदी धनंजय आराध्ये यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संघात नव्याने सहभागी झालेल्या सुरेश राठोड, धनंजय आराध्ये व प्रमोद सोनकर यांचा राष्ट्रीय अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीत तालुक्यातील प्रलंबित प्रश्न, पत्रकारांच्या अडचणी, विविध शासकीय कार्यालयांतील नागरिकांच्या समस्या तसेच सामाजिक विषयांवर संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल तसेच आवश्यकतेनुसार लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिकाही स्वीकारली जाईल, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बैठकीस तालुकाध्यक्ष अनिल माडपेल्लीवार, उपाध्यक्ष समाधान कांबळे, शहराध्यक्ष कुंदन तिवडकर, सचिव सय्यद इसा, अंबादास मुकटे, गोपाल चव्हाण, संजय वडसकर, मनोज जाधव, आदित्य खंदारे, सुरेश राठोड, धनंजय आराध्ये तसेच निर्भय युवा समाजकार्य संघटनेचे केशवभाऊ जाधव, शरीफ शेख, सादिक शेख, परविन जाधव, हिरामण वाघमारे, आकाश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रीय अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार यांनी केले. सूत्रसंचालन सय्यद इसा यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल माडपेल्लीवार यांनी मानले.







