ज्ञानेश्वर बनसोड
तालुका प्रतिनिधी सिंदखेड राजा
सिंदखेड राजा : ग्रामपंचायत निमगाव वायाळ येथे संगणक चालक पदासाठी नियमाप्रमाणे भरती प्रक्रिया पूर्ण होऊनही संबंधित उमेदवाराला ऑगस्ट 2025 पासून आजतागायत नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही. या भरतीस ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी ठराव मंजूर करून मान्यता दिलेली असतानाही प्रत्यक्ष नियुक्ती जाणूनबुजून रखडवली जात असल्याचा गंभीर आरोप उमेदवाराने केला आहे.उमेदवाराच्या म्हणण्यानुसार, नियुक्तीबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांकडून किरकोळ व असंबंध कारणे सांगून विषय टाळला जात आहे. विशेष म्हणजे, “बुलढाणा कार्यालयात पैसे दिल्याशिवाय नियुक्ती होत नाही” असे सांगून मुद्दाम विलंब केला जात असल्याचा धक्कादायक आरोपही उमेदवाराने केला आहे.या प्रकारामुळे संबंधित उमेदवार आर्थिक व मानसिक तणावात सापडला असून ग्रामपंचायतीतील कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठराव होऊनही नियुक्ती न देणे हे प्रशासकीय नियमांचे उल्लंघन असून, यामागे आर्थिक व्यवहाराचा संशय बळावल्याने ग्रामस्थांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे.या संपूर्ण प्रकरणात संबंधित गटविकास अधिकारी यांनी तात्काळ हस्तक्षेप करून प्रकरणाची चौकशी करावी व न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी संगणक चालक भरती उमेदवाराकडून करण्यात येत आहे. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार व आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणाकडे पंचायत समिती व जिल्हा प्रशासन गांभीर्याने पाहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







