रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागाव : येथील मातोश्री शिक्षण संकुलातील विद्यार्थिनी मृण्मयी सुरोशे हिने गणित ऑलिंपियाड स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी गोल्ड मेडल पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेत विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक दिगंबर जगताप सर उपस्थित होते. यावेळी लोकेश सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका गावंडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मृण्मयीने मागील वर्षी देखील राज्यस्तरावर अव्वल येत गोल्ड मेडल आणि धनादेश मिळवला होता. विशेष बाब म्हणजे तिने कोणत्याही ट्युशन क्लासेसचा आधार न घेता केवळ स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या जिद्दीचे आणि आत्मविश्वासाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मृण्मयीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत इतर विद्यार्थ्यांनीही तिचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान फाउंडेशन क्लासमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.






