स्वरूप गिरमकर
तालुका प्रतिनिधी शिरूर
शिरूर : भूमी फाउंडेशन संचलित कृषी कन्या निवासी प्रकल्प, वाघोली येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला विद्यार्थी, ग्रामस्थ आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थ निवृत्ती अण्णा गवारे, वडू खुर्द येथील ग्रामस्थ सचिन संजय पवळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. कैलास पवार, प्रकल्प संचालिका अध्यापिका अनिता पवार तसेच निवासी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सर्वांनी मानवंदना देत छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला अभिवादन केले. प्रतिमेच्या पूजनावेळी सचिन संजय पवळे यांनी जोशपूर्ण “शंभू गर्जना” करत संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने दुमदुमून टाकला. त्यांच्या घोषणेमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साह आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी निवृत्ती अण्णा गवारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान हे केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. धर्म, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा यासाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान प्रत्येक पिढीने स्मरणात ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्या त्यागाची जपणूक करणे हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कैलास पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म आणि स्वराज्यासाठी असह्य यातना सहन करूनही कधीही माघार घेतली नाही. त्यांच्या जीवनातील संघर्ष, पराक्रम, शौर्य आणि अदम्य इच्छाशक्ती आजही प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणते. आयुष्यात एकही लढाई न हरलेले आणि सतत विजयाच्या दिशेने वाटचाल करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे युवा पिढीसाठी कायम प्रेरणास्थान राहतील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित घोषवाक्ये, प्रेरणादायी विचार आणि देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून अभिवादन केले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्ती, इतिहासप्रेम आणि स्वराज्याच्या विचारांनी भारलेला होता. कार्यक्रमाचे आयोजन भूमी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून उपस्थितांनी “जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.






